पाकिस्तानात पोलिओ निर्मूलन मोहिमेला दहशतवाद्यांचा असणारा विरोध अद्याप मावळला नसल्याचे बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मुलांना पोलिओ लस देण्यासाठी निघालेल्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस मृत्युमुखी पडला, तर अन्य एका पोलिसाची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील खैबर-पख्तुनवाला परगण्यात या मोहिमेला अधिक तीव्र विरोध असून बुधवारी एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या कार्यकर्त्यांना  सुरक्षा देणाऱ्या पोलिसांपैकी एक जण या गोळीबारात मृत्युमुखी पडला, तर अन्य एक पोलीस गंभीररीत्या जखमी झाला. पोलिओ निर्मूलनाची मोहीम राबविणारे कार्यकर्ते मात्र सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकिस्तानात सक्रिय असणाऱ्या दहशतवाद्यांचा व विशेषत: तहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा पोलिओ निर्मूलन मोहिमेस तीव्र विरोध आहे.  वर्षांरंभी दहशतवाद्यांनी हे कार्य करणाऱ्या आठ जणांची हत्या केली, तर डिसेंबरमध्य  खैबर-पख्तुनवाला व कराची येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या मोहिमेतील सात जणांनी प्राण गमावले.