पत्नीचा छळ केल्याच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यावर आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, त्यांनी गेल्या वर्षी एका मध्यरात्रीच्या घटनेत आफ्रिकी (युगांडा) महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी भारती यांच्याविरोधात वेगळी तक्रारही न्यायालयात सादर केली आहे.

पुरवणी आरोपपत्र महानगर दंडाधिकारी अंकिता लाल यांच्यासमोर पोलिसांनी दाखल केले असून, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले, की सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणातही भारती यांच्यावर खटला भरण्यास परवानगी दिली आहे. बावीस पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले असून, त्याला न्यायवैद्यक खात्याच्या प्रयोगशाळेचा अहवाल व संचालकांचा अहवाल जोडण्यात आला आहे. न्यायालयाने ३० ऑक्टोबरला या प्रकरणी सुनावणी करण्याचे ठरवले आहे. तपासी अधिकारी विजय चंडेल यांच्या अहवालावर न्यायालय निर्णय देणार आहे. दरम्यान, भारती यांच्या पत्नी लिपिका यांनी त्यांच्यावर आधीच घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे व त्या प्रकरणात भारती हे आधीच तुरुंगात आहेत. आफ्रिकी महिलांचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केले होते.