भारतात कोविड १९ विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचे शिखर  हे एप्रिलच्या मध्यावधीत गाठले जाईल, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले असून त्यानंतर मे महिना अखेरीपर्यंत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होईल असे सांगण्यात आले.

कोविडच्या पहिल्या लाटेत भारतात ‘सूत्र’ या गणिती प्रारूपाचा वापर करण्यात आला होता, त्याचाच वापर करून आता वैज्ञानिकांनी असे सांगितले होते, की ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहील नंतर ती सप्टेंबरमध्ये अधिक असेल, फेब्रुवारी २०२१ मध्ये ती कमी राहील. तो अंदाज जवळपास खरा ठरला आहे याचा अर्थ हे प्रारूप यशस्वी झाले आहे.

कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी ‘सूत्र’ प्रारूपाचा पुन्हा वापर केला असून त्यांच्या अंदाजानुसार सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे ते एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल. सध्या करोनाची जी लाट आहे ती एप्रिलमध्यापर्यंत जास्त राहील नंतर रुग्णांची संख्या कमी होईल. गेले काही दिवस आपण भारतात रुग्ण  वाढताना पाहतो आहोत पण त्याची शिखरावस्था १५ ते २० एप्रिल दरम्यान येईल,  नंतरच्या काळात ती ओसरण्यास सुरुवात होईल. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मात्र करोनाची घसरण खूपच जास्त असेल. तेव्हा करोना रुग्णांची संख्या खूपच कमी झालेली दिसेल असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, दैनंदिन नवीन रुग्णांच्या संख्येतील शिखरावस्था सांगण्यात अनिश्चिातता असते. कारण ही संख्या रोजच जास्त वाढत असते. सध्या दिवसाला १ लाख लोकांना तरी संसर्ग होत आहे. पण तो कमी होण्याची शक्यताच अधिक आहे. असे असले तरी १५ ते २० एप्रिल दरम्यान दुसऱ्या लाटेची (सध्या चालू असलेल्या) शिखरावस्था गाठली जाईल. सध्याच्या लाटेत पंजाबने सर्वांत आधी व त्यानंतर महाराष्ट्राने शिखरावस्था गाठली. कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक अग्रवाल यांच्या मते ‘सूत्र’ नावाच्या प्रारूपानुसार नवीन शिखरावस्था आम्ही एप्रिलच्या मध्यावधीत वर्तवली आहे, पण दैनंदिन रुग्ण कसे व किती वाढतात यावर ते अवलंबून असेल. दैनंदिन रुग्णवाढीत काही हजारांनी बदल झाला, तरी शिखरावस्था ही एप्रिल मध्यावरच राहील. स्वतंत्र गणिती आकडेमोडीनुसार हरियाणाच्या अशोक विद्यापीठाचे गौतम मेनन यांनी दुसऱ्या लाटेची शिखरावस्था ही एप्रिल मध्य व मे मध्य यांच्या दरम्यान राहील असा अंदाज दिला आहे. मेनन यांनी सांगितले, की हा केवळ लघु अंदाज आहे, ठाम नव्हे.

२४ तासांत ८१,४६६ रुग्ण

नवी दिल्ली : देशात गेल्या एक दिवसात आणखी ८१ हजार ४६६ जणांना करोनाची लागण झाली असून हा गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक आहे. त्यामुळे देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता एक कोटी २३ लाख तीन हजार १३१ वर पोहोचली आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी ४६९ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या एक लाख ६३ हजार ३९६ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सलग २३ व्या दिवशीही वाढ झाली असून सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या सहा लाख १४ हजार ६९६ वर पोहोचली आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या पाच टक्के इतके आहे. करोनातून बरे होण्याच्या प्रमाणात आणखी घट झाली असून ते सध्या ९३.६७ टक्के इतके आहे. करोनातून आतापर्यंत एक कोटी १५ लाख २५ हजार ०३९ जण बरे झाले आहेत, तर मृत्युदर १.३३ टक्के इतका आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे आणखी ४६९ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २४९ जण महाराष्ट्रातील आहेत.

देशात आतापर्यंत एक लाख ६३ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ५४ हजार ८९८ जण महाराष्ट्रातील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.