अमेरिकेतील वरिष्ठ काँग्रेस सदस्यांचे मत

भारत हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार असून त्या देशाला करोना साथीविरोधात लढण्यासाठी अमेरिकेच्या मदतीची गरज असून अधिकाधिक लशी भारताला देण्यात याव्यात, असे मत अमेरिकेतील वरिष्ठ काँग्रेस व सेनेट सदस्यांनी व्यक्त केले आहे.

सेनेट सदस्यांनी म्हटले आहे, की मित्र देशांना मदत करताना बौद्धिक संपदा हक्कांचेही संरक्षण करायला हवे. कोविड प्रतिबंधात्मक उपायांसाठी भारताला मदतीची गरज असून भागीदार देशांना मदतीची हीच संधी आहे, असे मत काँग्रेस सदस्य ब्रॅड वेनस्ट्रप यांनी व्यक्त केले आहे. ऑपरेशन वार्प स्पीडच्या माध्यमातून अमेरिकेने सुरक्षित व प्रभावीपणे लस पुरवली आहे. अमेरिकी बौद्धिक संपदा हक्क सुरक्षित राखून जगातील मित्र देशांना मदत करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

अध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात असे म्हटले होते, की अमेरिकेत २.५ कोटी न वापरलेल्या लशी पडून आहेत. त्यातील ७५ टक्के म्हणजे १.९ कोटी लशी कोव्हॅक्स जागतिक कार्यक्रमाला दिल्या जाणार आहेत. भारतालाही यातून लस पुरवठा करण्यात येणार असून थेट पुरवठा किंवा कोव्हॅक्सच्या माध्यमातून पुरवठा असे दोन प्रकार यात असल्याचे भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी म्हटले आहे. काँग्रेस सदस्य जिम कोस्टा यांनी सांगितले, की भारताची करोना विरोधातील लढाई सुरूच आहे. त्यामुळे भारतासह मित्र देशांना लस पुरवणे गरजेचे आहे. करोनावर मात करण्यासाठी जागतिक सहकार्य गरजेचे आहे.

या वेळी अनेक काँग्रेस व सेनेट सदस्यांनी भारताला लस पुरवठा करण्याच्या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले. बायडेन प्रशासनाने भारताला वैद्यकीय मदत केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्याआधी काँग्रेस व सेनेट सदस्यांची भेट घेऊन त्यांना देशातील वास्तव परिस्थितीची माहिती दिली होती.