देशातील एकूण रुग्णसंख्या ३१; सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्याची सूचना

नवी दिल्ली : दिल्लीतील एका व्यक्तीच्या प्रवास इतिहासानुसार तो थायलंड व मलेशियाला जाऊन आला असून त्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे भारतातील एकूण निश्चित रुग्णांची संख्या आता ३१ झाली आहे.

दिल्लीतील हा तिसरा रुग्ण आहे. त्याची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. आरोग्य खात्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्वच देशांच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता आरोग्य तपासणीस सामोरे जावे लागणार आहे. तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली असून एकूण ३० विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. करोना विषाणूवर एक दिवसाचा राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम आरोग्य मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयोजित केला होता. त्यात विविध राज्यांचे २८० आरोग्य अधिकारी उपस्थित होते, त्यात रेल्वे, संरक्षण व निमलष्करी दलांच्या रुग्णालयांच्या आरोग्य अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आतापर्यंतच्या ३० रुग्णांत दिल्लीतील मयूरविहारचा एक, आग्रा येथील त्याचे सहा नातेवाईक, गुरगाव येथील पेटीएम कर्मचारी (रा. पश्चिम दिल्ली) यांचा समावेश असून त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाझियाबाद येथे सापडलेल्या रुग्णावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबाद येथेही एक रुग्ण सापडलेला आहे त्याला वेगळे ठेवण्यात आले आहे. इटलीचे सोळा पर्यटक व त्यांचा भारतीय वाटाडय़ा (पर्यटन मार्गदर्शक) यांचाही रुग्णात समावेश आहे. एक इटालियन व्यक्ती व त्याची पत्नी यांना जयपूर येथील सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केले असून  इतर १४ जणांना व वाटाडय़ा भारतीयाला  छावला येथील आयटीबीपी छावणी व मेदांत रुग्णालय येथे ठेवण्यात आले आहे. एकूण आकडेवारीत केरळात सुरूवातीला सापडलेल्या ३ रुग्णांचा समावेश आहे. ते तिघेही बरे होऊन घरी परतले आहेत.  दरम्यान, रायपूर येथे दुबईमार्गे केनियातून परतलेल्या एकावर करोनाचा संशय असून त्याला घरातच वेगळे ठेवण्यात आले आहे.

अमृतसरमध्ये इटालियन पर्यटकांची तपासणी

इटलीमधील १३ पर्यटकांचा चमू सध्या अमृतसर  येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असून त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय बाहेर न पडण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. गुरुवारी रात्री हे पर्यटक येथे पोहोचले असून त्यांना त्यांच्या खोल्यांमध्येच ठेवण्यात आले आहे, असे अमृतसरच्या जिल्हा  शल्यचिकित्सक प्रभदीप कौर यांनी सांगितले. त्यांच्यातील कुणाला करोनाची लक्षणे असतील तर त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्याच्या करोना तयारीचा आढावा घेतला असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

अमेरिकेत ८.३ अब्ज डॉलरची तरतूद : करोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेन ८.३ अब्ज डॉलरती तरतूद केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत करोनाने १२ बळी घेतले आहेत. डेमोक्रॅटिक व रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांनी या विधेयकास पाठिंबा दिला असून ते अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवले जाणार आहे. अमेरिकेत १८० जणांना संसर्ग झाला असून गुरुवारी वॉशिंग्टनमधील रुग्णसंख्या ३९ वरून ७० झाली. येथील अनेक आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.