करोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरामधील विषाणू निष्क्रिय होतात. तसेच या मृतदेहाच्या माध्यमातून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून करोनाबाधितांच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहांवर सध्याच्या प्रोटोकॉलप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले पाहिजे, असं नवी दिल्लीमधील भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजेच एम्समधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये म्हटलं आहे. एखाद्या व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नाक किंवा तोंडामध्ये करोनाचे विषाणू आढळून येत नाहीत असं या अभ्यासात दिसून आलं आहे.

या अभ्यासादरम्यान एम्सच्या डॉक्टरांनी करोनामुळे मरण पावलेल्या १०० मृतदेहांच्या चाचण्या केल्या. मरण पावल्यानंतर या मृतदेहांच्या शरीरामधील स्वॅब घेऊन चाचण्या करण्यात आल्या तेव्हा त्यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. एम्सच्या फॉरेन्सिंग विभागाचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहांच्या माध्यमातून संसर्ग होत असल्याच्या मुद्द्यांवर अभ्यास करण्यासाठी आम्ही एक छोटा प्रयोग केला होता. या चाचणीदरम्यान करोनामुळे मरण पावलेल्यांच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या गळ्यातील आणि नाकातील स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यावेळी आम्हाला त्यांच्या शरीरामध्ये करोना विषाणू आढळून आला नाही.

मात्र एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांमध्ये शरीरामधून निघणाऱ्या द्रव्य पदार्थांसंदर्भात खबरदारी घेणं गरजेचं असल्याने मृतदेहांच्या थेट संपर्कात येणं टाळलेलं अधिक योग्य ठरतं. त्यामुळेच भारत सरकारने एम्समधील फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करोनामुळे मरण पावल्यानंतर मृतदेह कशापद्धतीने हाताळण्यात यावे यासंदर्भातील नियमावली तयार केली आहे. एम्समधील अभ्यासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारेच करोना मृतांच्या अंत्यसंस्काराचे निर्देश सरकारकडून जारी करण्यात आलेत. हे निर्देश तयार करण्यामध्ये डॉ. सुधीर गुप्ता यांच्यासोबतच एम्समधील डॉक्टरांचाही समावेश आहे.

करोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह हाताळताना हातामध्य ग्लोव्हज, पीपीई कीट घालूनच काम करण्याचे निर्देश एम्सच्या नियमावलीमध्ये आहेत. अंत्यसंस्कार केल्यानंतर पुढील धार्मिक विधीसाठी अस्थी गोळा करणे हे पुर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळाही डॉक्टर गुप्ता यांनी केलाय. तसेच करोनाबाधित व्यक्तीचे शवविच्छेदन टाळल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण कमी करता येईल असंही सांगण्यात आलं आहे.