देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. करोनाच्या संकटाशी सामना करताना देशभरातून काही सकारात्मक तर काही नकारात्मक बातम्या सातत्याने समोर येत आहे. अशीच एक बातमी आता राजस्थानच्या पश्चिमेकडे अशणाऱ्या बारमेर जिल्ह्यातून समोर आलीय. येथे करोनामुळे एका व्यक्तीचं निधन झालं. त्यानंतर या व्यक्तीवर अंत्यसंस्कार सुरु असतानाच त्याच्या मुलीने जळत्या चितेवर उडी मारली. तेथे उपस्थित असणाऱ्या नातेवाईकांनी धावपळ करत कसं तरी तिला त्या चितेवरुन बाजूला केलं आणि रुग्णालयात दाखल केलं. ही तरुणी ७० टक्के भाजली आहे. या मुलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारत पाकिस्तान सीमेला लागून असणाऱ्या बारमेर जिल्यामध्ये मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे. बारमेरच्या जिल्हा मुख्यालयाजवळच्या रॉय कॉलिनी येथे राहणाऱ्या दामोदर दास शारदा यांचा करोनामुळे मृत्यू झाला. घरच्या व्यक्तींनी जिल्हा मुख्यालयाच्याजवळच असणाऱ्या स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. चितेला मुखाग्नि देण्यात आला. चितेला अग्नी देण्यात आला तेव्हा दामोदर यांचे नातेवाईक आणि मुलीही स्मशानभूमीमध्ये उपस्थित होते.

आणखी वाचा- Coronavirus: देशातली रुग्णसंख्या तीन लाखांच्या घरातच! गेल्या २४ तासात ३,७८० मृतांची नोंद

चिता जळू लागल्यानंतर दामोदर यांची ३० वर्षीय मुलगी चंद्रा शारदाने जळत्या चितेवर उडी मारली. समोरचं दृष्य पाहून उपस्थितांचा एकच गोंधळ उढाला. मात्र चंद्राची थोरली बहीण पिंकीने (वय ३५) तिला बाहेर काढण्यासाठी खटपट सुरु केली. त्यानंतर इतरांनाही तिला मदत केली. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चंद्राला बाहेर काढण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचं ७० टक्के शरीर जळालं होतं. चंद्राला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार सुरु असले तरी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

स्मशानघाट विकास समितीचे भैरु सिंह फुलवरिया यांनी दामोदर दास यांच्या नातेवाईकांनी वाद घालून या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळवल्याचं सांगितलं. दामोरदर यांच्या कुटुंबियांनी करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार होतात तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार न करता सार्वजनिक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले. दामोदर दास यांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर त्यांच्या मुलीने चितेवर उडी मारली. तिला उपलब्ध असणाऱ्या गाडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, असं फुलवरिया म्हणाले.

आणखी वाचा- ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही; अलाहाबाद हायकोर्टाने फटकारलं

यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयामध्ये जाऊन या मुलीचा जबाब नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ही मुलगी जबाब नोंदवण्याच्या परिस्थितीमध्ये नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तिला बरं वाटू लागल्यानंतर जबाब नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलीची परिस्थिती चिंताजनक असल्याने बारमेर येथे प्राथमिक उपचार करुन प्रकृती स्थिर झाल्यावर तुला जोधपुरच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात येणार आहे.