करोना व्हायरसमुळे भारतात आणखी एक मृत्यू झाला आहे. कोलकात्यामध्ये एका रुग्णाचा सोमवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसमुळे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

एएमआरआय रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या आठवडयात या व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले होते, तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मृत व्यक्तीला ह्दयविकाराचाही त्रास होता. मृत व्यक्ती इटलीला जाऊन आला होता. त्याचे कुटुंब तिथे राहते.

हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. पश्चिम बंगालमध्ये करोना व्हायरसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. देशात करोना व्हायरसचे एकूण ४१५ रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. करोना व्हायरसमुळे जगभरात १४ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.