करोना प्रतिबंधक लस आणि टाळेबंदी या उपायांमुळे ब्रिटनमधील करोना संसर्गाचे प्रमाण ६० टक्क्य़ांनी कमी झाले आहे. ब्रिटनमधील कोविड-१९ लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या विषाणूचा संसर्ग आणि गंभीर स्वरूपाचा आजार किंवा मृत्यू यांच्यातील साखळी तुटण्याची सुरुवात झाली असल्याचे इंग्लंडमधील महासाथीबाबत सुरू असलेल्या अभ्यासाच्या ताज्या निष्कर्षांमध्ये आढळले आहे.

एकीकडे देशव्यापी टाळेबंदीच्या उपायांनी करोनाचा फैलाव कमी झालेला असतानाच मार्च महिन्यात करोना संसर्गाचे प्रमाण सुमारे ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे लंडनच्या इंपिरियल कॉलेजमधील संशोधकांना आढळले. लसीकरण कार्यक्रमात वृद्धांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्यामुळे ६५ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लोकांना या कार्यक्रमाचा सर्वात जास्त फायदा झाला असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता सर्वात कमी आहे.

करोनाचा संसर्ग आणि मृत्यू यांच्यातील संबंध विभक्त होत असल्याचाही अभ्यासाचा निष्कर्ष आहे. व्यापक लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यापासून संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे, तसेच मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे यावरून दिसून आले आहे.

देशातील ३० वर्षांहून कमी वयाच्या लोकांना शक्य असेल तेथे अ‍ॅस्ट्राझेनेके लशीला पर्यायी लस देण्यात येईल, असे सुधारित निर्देश ब्रिटन सरकारने बुधवारी जारी केले. यानंतर लसीकरणाची नव्याने पडताळणी होत असतानाच ही सकारात्मक बातमी आली आहे.

मुलांसाठी लसवापर वाढवण्याची ‘फायझर’ची मागणी

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कच्या फायझर व जर्मनीच्या बायोएनटेक कंपनीने अशी विनंती केली आहे,की त्यांच्या करोनाप्रतिबंधक शीचा वापर १२ ते १५ या वयोगटातील मुलांसाठी करू द्यावा. डिसेंबरमध्ये फायझर ही दोन लशींची मात्रा तयार करण्यात आल्यानंतर ती सोळा वर्षांवरील व्यक्तींमध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आली होती.  या कंपन्यांनी म्हटले आहे,की  १२ ते १५ वयोगटातील मुलांवर ज्या चाचण्या करण्यात आल्या त्याचे निकाल ३१ मार्च अखेर हाती आले असून ही लस त्यांच्यात सुरक्षित व प्रभावी ठरली आहे. या लशीने संसर्ग रोखला जात असून ती शंभर टक्के प्रभावी आहे.