करोनाच्या नवीन विषाणूची शक्ती आणि घातकता दिवसोंदिवस कमी होत असून हा विषाणू हळूहळू निष्प्रभ होत असल्याचा असल्याचा दावा इटलीमधील एका वरिष्ठ डॉक्टरने केला आहे. “क्लिनिकली हा विषाणू आता इटलीमध्ये अस्तित्वात नाही,” असा दावाही इटलीतील सॅन रफाईल रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर अल्बार्टो झांग्रिलो यांनी केला आहे. इटलीमध्ये करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या लोम्बार्डीच्या उत्तरेला असणाऱ्या मिलानमध्ये  सॅन रफाईल रुग्णालय आहे. या डॉक्टरांनी केलेल्या दाव्यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“गेल्या दहा दिवसांमध्ये करण्यात आलेल्या स्वॅब चाचण्यांमध्ये विषाणूंचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आलं आहे. हेच प्रमाण एक ते दोन महिन्यांपूर्वी अगदी प्रचंड होते. सध्याच्या स्वॅबमधील विषाणूंचे प्रमाण हे तुलनेने खूपच कमी आहे,” असा निष्कर्ष समोर आल्याची माहिती अल्बार्टो यांनी आरएआय टेलिव्हिजन या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. रविवारी त्यांनी देशातील करोना विषाणूच्या वैज्ञानिक घडामोडींसंदर्भात एक मुलाखत दिली. त्यावेळीच त्यांनी करोनाचा परिणाम कमी होत असल्याचे दिसून येत आहे असा दिलासा देणारा निष्कर्ष नोदंवला आहे. डॉक्टर अल्बार्टो हे इटलीमधील आघाडीच्या डॉक्टरांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांनी केलेला हा दावा करोनामुळे सध्या भितीचे वातावरण असणाऱ्या देशांमधील नागरिकांसाठी आशादायक आहे.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटलीचा समावेश आहे. करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीमध्ये इटली तिसऱ्या स्थानी आहे. २१ फ्रेब्रुवारीपासून इटलीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल. त्यानंतर दोन महिन्यांमध्ये येथे ३३ हजार ४१५ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. देशामध्ये करोनाबाधित रुग्णांचा आकडाही २ लाख ३३ हजारांहून अधिक आहे. मात्र मे महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भावर इटलीमध्ये हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच इटलीने लॉकडाउनचे नियम हळूहळू शिथिल केले आहेत. युरोपमध्ये सर्वाधिक सक्तीचा लॉकडाउन अंमलात आणणाऱ्या देशांमध्ये इटली आघाडीवर होता. मात्र करोनाचा प्रादुर्भाव मागील एका महिन्यापासून हळूहळू कमी होत असल्याने एक एक सेवा टप्प्या टप्प्यात सुरु केली जात आहे.

काही आरोग्य तज्ञ करोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेसंदर्भाच्या संभाव्यतेबद्दल खूपच गोंधळ आहेत. त्यामुळे राज्यकर्त्यांनीच आता नवीन वास्तव विचारात घेण्याची गरज असल्याचे मतही झांग्रिलो यांनी व्यक्त केलं आहे. “आम्हाला हळू हळू सर्व काही सुरु करुन सामान्य आयुष्य जगाणारा देश बनायचे आहे. मात्र देशात दहशत निर्माण करण्याची जबाबदारी कुणाला तरी घ्यावी लागेल,” अशा शब्दात त्यांनी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवणाऱ्यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

सध्या सावधान राहण्याची गरज असून सर्वांना काळजी घ्यावी असं आवाहन सरकारमार्फत वारंवार करण्यात येत आहे. करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये आताच विजय घोषित करणं थोडं घाई केल्यासारखं होईल असं सरकारचं मत आहे. “करोनाचा विषाणू नष्ट झाला आहे यासंदर्भातील संशोधनाला पाठिंबा देणारे वैज्ञानिक पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. मात्र यांच्याकडे यासंदर्भातील काही ठोस पुरवानिशी माहिती असेल त्यांनी समोर यावे आणि इटलीमधील जनतेला या गोंधळामधून मुक्त करावे,” असं देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या उप-सचिव सँड्रा जाम्पा यांनी एका निवेदनामध्ये म्हटलं आहे. “इटलीमधील नागरिकांनी घराबाहेर पडणात जास्तीत जास्त सावधानता बाळगावी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत, मोठ्या संख्येने गटागटाने भेटू नये, वारंवार हात धुवावे, मास्कचा वापर करावं असं आवाहन आम्ही सरकारच्या वतीने करत आहोत,” असंही जाम्पा म्हणाल्या आहेत.

केवळ डॉक्टर झांग्रिलोच नाही तर उत्तर इटलीमधील इतर डॉक्टरांनाही राष्ट्रीय वृत्तसंस्था असणाऱ्या एएनएसएशी बोलताना करोना विषाणूची शक्ती कमी होताना दिसत असल्याचे म्हटलं आहे. जेनोवा शहरामधील सॅन मार्टिनो रुग्णालयामधील संसर्गजन्य रोग्य विभागाचे प्रमुख मॅटिओ बासेट्टी यांनीही यासंदर्भात आपले मत व्यक्त केलं आहे. “हे स्पष्ट आहे की आजचा कोविड-१९ हा आजार वेगळा आहे. दोन महिन्यापूर्वी या विषाणूची शक्ती जितकी होती तितकी आता आहे असं म्हणता येणार नाही,” असं डॉ. बासेट्टी यांनी सांगितलं आहे.