नवी दिल्ली : महाराष्ट्र व पंजाब या राज्यात दैनंदिन रुग्णांची एकूण संख्या देशात गेल्या पंधरा दिवसांत सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे. ही दोन्ही राज्ये करोना संसर्गात अग्रक्रमावर असून नवीन रुग्णांची संख्या तेथे जास्त आहे.

त्यानंतर चंडीगड, छत्तीसगड व गुजरात हे पहिल्या पाच क्रमांकात आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या सात दिवसांत म्हणजे २३ मार्चपर्यंत महाराष्ट्रात नवीन रुग्णांचे प्रमाण ३.६ टक्के तर पंजाबमध्ये ३.२ टक्के इतके वाढले आहे. महाराष्ट्रात एकूण  ४ लाख २६ हजार १०८ रुग्ण सापडले असून गेल्या दोन आठवडय़ाच्या अखेरची ही संख्या ३१ मार्चपर्यंतची आहे. पंजाबमध्ये याच काळात ३५,७५४ रुग्ण सापडले असून ३१ मार्चला संपलेल्या दोन आठवडय़ात महाराष्ट्र व पंजाब या राज्यात साठ टक्के मृत्यू झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, केरळ, चंडीगड , गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, हरयाणा ही राज्ये चिंताजनक गटात मोडत आहेत. रोज या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर दैनंदिन मृत्युदरही वाढला आहे. या राज्यांची रुग्णसंख्या एकूण देशातील संख्येच्या ९० टक्के होती तर मृत्यूचे प्रमाण देशाच्या मृत्युदराचा विचार करताना ३१ मार्च अखेर संपलेल्या आठवडय़ात ९०.५ टक्के होते.

या राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ होत आहे. ३ एप्रिलला कॅबिनेट सचिवांनी या राज्यातील परिस्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेतला होता.