News Flash

करोना रुग्णसंख्येचा अक्षरश: विस्फोट! २४ तासांत एक लाखांहून अधिक नवे रुग्ण; ५०० मृत्यू

पहिल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्येचा विक्रमही निघाला मोडीत

देशात रेकॉर्ड ब्रेक करोना रुग्ण आढळून आले आहेत.

देशातील करोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. देशात करोनानं पाऊल ठेवल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या विक्रमी संख्येनं करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत १६ सप्टेंबर २०२० रोजी देशात एका दिवसांतील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली होती. रुग्णसंख्येचा हा विक्रमही सोमवारी समोल आलेल्या आकडेवारीने मोडीत काढला असून, गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक नागरिकांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत आढळून आलेल्या करोना रुग्णांची संख्या, मृत्यू आणि लसीकरण झालेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. रविवारी दिवसभरात देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ५२ हजार ८४७ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. या २४ तासांच्या कालावधीत देशात ४७८ म्हणजे जवळपास ५०० जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

देशात एका दिवसात इतक्या मोठ्या रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत देशात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्ण आढळून आले होते. १६ सप्टेंबर २०२० रोजी या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. देशात करोनाचा सर्वाधिक संक्रमणाचा काळ असताना ही नोंद झाली होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र संसर्गाचा वेग प्रचंड वाढला आहे. कुटुंबातील एका व्यक्तीला संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबालाच विषाणूची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात

देशात रविवारी दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. राज्यात ४ एप्रिल रोजी तब्बल ५७ हजार नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात ५७ हजार ७४ नवीन करोनाबाधित आढळले असून, २२२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के असून, आतापर्यंत ५५ हजार ८७८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ४,३०,५०३ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 9:47 am

Web Title: coronavirus update india breaches 1 lakh daily mark 478 deaths in the last 24 hours bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 छत्तीसगडमध्ये २२ जवान शहीद होणं गुप्तचर यंत्रणेचं अपयश?; CRPF प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
2 “मास्क घालण्याची गरज नाही, कारण आसाममधून करोना गेला”; भाजपाच्या मंत्र्याचं विधान
3 “हे प्रकरण ईव्हीएमवरचा उरलासुरला विश्वास उडविणारं आणि…”
Just Now!
X