करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये २४ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करुन करोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या काळामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार असून गरज नसताना लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन शासकीय यंत्रणांनी केलं आहे. असं असतानाही अनेकजण कारण नसताना बाहेर पडताना दिसत आहेत. अशा लोकांवर पोलीस कारवाई करताना अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सध्या तेलंगणमधील पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

तेलंगणमधील एका काँग्रेसच्या नेत्याने पोलीस सामान्य नागरिकांना कशाप्रकारे मारहाण करत आहेत यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तीन जणांना पोलीस हवालदार काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. एक पोलीस मारहाण करत असताना दुसरा पोलीस अधिकारी मारहाण करण्यात येत असलेल्या व्यक्तीच्या हातावर पाय ठेऊन उभा असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे घरातील व्यक्तींसमोरच या लोकांना मारहाण करण्यात आली आहे.

“(करोनाच्या) साथीमुळे पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. नेहमीप्रमाणेच गरीब लोकं पोलिसांचं मुख्य लक्ष्य ठरत आहेत. श्रीमंतांना अशी मारहाण करण्याची हिंमत पोलीस करतील का? हा व्हिडिओ तेलंगणमधील आहे. सरकार आणि न्यायालय काही कारवाई करेल अशी अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही,” अशी कॅप्शन श्रीवस्ता या काँग्रेस नेत्याने हा व्हिडिओ शेअऱ करताना दिली आहे.

प्रसिद्ध समाजसेवक आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनाही हा व्हिडिओ शेअर करत एक चिंता व्यक्त केली आहे. “हे लज्जास्पद आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओची आपल्याला सवय होईल अशी मला भीती वाटतेय,” असं मत यादव यांनी व्यक्त केलं आहे.

काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. महाराष्ट्रामध्येही अशाप्रकारे व्हिडिओ मागील आठवड्यात सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.