भाडोत्री मारेकऱ्यांपेक्षाही भ्रष्टाचारी नेते व सरकारी अधिकारी खतरनाक असतात अशी टिप्पणी गुजरात हायकोर्टानं केली आहे. जामिनाच्या अर्जावर एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना ही टिप्पणी न्यायाधीशांनी केली आहे. अहमदाबाद नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आरसी शाह याच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू होती. भ्रष्टाचारी नेतेव सरकारी अधिकारी यांच्यामुळे भारतात आर्थिक अशांती पसरल्याचं न्यायाधीश म्हणाले.

कुठल्याही विकसनशील देशामध्ये भाडोत्री मारेकऱ्यापेक्षा जास्त खतरनाक कुणी असेल तर ते म्हणजे सरकारी व राजकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचाऱ्यांचा अशा शब्दांमध्ये न्यायाधीशांनी भ्रष्टाचाराविरोधातला आपला रोष प्रकट केला. त्यांनी शाहला जामिन द्यायचं तर नाकारलंच शिवाय अशा प्रकरणांमध्ये अत्यंत कटक रहायला हवं असं मतही व्यक्त केलं.

आरसी शाह नगराध्यक्ष होता शिवाय अहमदाबाद महापालिकेच्या एलजी हॉस्पिटलचा संचालक होता. लाच घेताना पकडलं गेल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलं होतं. सरकारी अधिकारी जर लाच घेताना पकडले गेले असतील तर त्यांना अत्यंत दुर्मिळ प्रकरणातच अटकपूर्व जामिन द्यायला हवा अन्यथा अजिबात जामिन देता कामा नये असं न्यायाधीश पार्डीवाला यांनी निक्षून सांगितलं आहे.

प्रत्येक व्यक्तिला अगदी आरोपीलाही व गुन्हेगारालाही घटनेनं काही अधिकार दिले आहेत. त्यांचा संदर्भ देत पार्डीवाला म्हणाले की त्यांना अधिकार आहेत, पण त्याचबरोबर समाजालाही काही अधिकार आहेत आणि कायद्यानं त्यांचीही सुरक्षा करायची आहे. त्यामुळे आरोपी वा गुन्हेगारांच्या अधिकारांचं पालन करताना समाजाच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होता कामा नये असं बजावत त्यांनी शाहचा जामिन अर्ज फेटाळला.