तीन कोटी करोना योद्धय़ांच्या लसीकरणाचा पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकारतर्फे उचलण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. पहिल्या टप्प्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या दूरचित्र माध्यमाद्वारे घेतलेल्या बैठकीत मोदी यांनी पुन्हा एकदा भारतातील लसीकरण कार्यक्रम ही जगातील सर्वात मोठी मोहीम असल्याचा पुनरुच्चार केला. येत्या शनिवारपासून लसीकरणास प्रारंभ होणार आहे. ‘‘येत्या काही महिन्यांत भारतातील ३० कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल, या तुलनेत जगातील ५० देशांमध्ये केवळ अडीच कोटीच नागरिकांना लस देण्यात येईल’’, असे मोदी म्हणाले.  लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या दोन्ही करोना लशी जगातील अन्य कोणत्याही उपलब्ध लशींपेक्षा प्रभावी असून त्या देशाची गरज म्हणून विकसित करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले. या बैठकीत पंतप्रधानांनी करोना साथीची सद्य:स्थिती आणि लसीकरणाच्या सज्जतेचा आढावा घेतला.

लसीकरण मोहिमेबरोबरच भारताचा करोना महासाथीविरोधातील लढा निर्णायक टप्प्यात पोहोचेल. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होताच आणखी काही लशी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी सांगितले.

* दोन्ही लशी देशातच तयार करण्यात आल्या आहेत, ही अभिमानाची बाब आहे. भारत परदेशी लशींवर अवलंबून राहिला असता तर किती कठीण गेले असते, याची आपण कल्पना करू शकतो.

* लसीकरणाचा पहिला टप्पा करोना योद्धय़ांसाठीच आहे. इतरांनी लस घेऊ नये, अशी माझी सूचना आहे. आम्हा लोकप्रतिनिधींचा समावेश पहिल्या टप्प्यात नाही.

* साथीच्या फैलावाबाबत आपला देश इतरांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचा अर्थ निष्काळजीपणा करणे असा नव्हे.

* लसीकरणाबद्दल अफवा पसरणार नाहीत, याची दक्षता राज्यांनी घ्यावी. अफवांना आळा घालण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक संस्थांची मदत घ्यावी.

‘शास्त्रज्ञांचाच शब्द अंतिम’ : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या परिणामकारकतेची आकडेवारी उपलब्ध नसतानाही तिच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल काही तज्ज्ञांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्याबद्दल मोदी म्हणाले, नागरिकांना प्रभावी लस देण्याबाबत शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. या बाबतीत शास्त्रज्ञांचाच शब्द अंतिम असेल, असे मी प्रथमपासून सांगत आलो आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.