पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये बोलताना शीख समाजाचे कौतुक केले. “शिखांनी जे योगदान दिले, त्याचा भारताला अभिमान आहे. शीख समाजाने देशासाठी भरपूर काही केलं आहे” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. गुरु साहिब यांचे शब्द आणि आशिर्वाद आमच्यासाठी अनमोल आहेत, असे मोदींनी सांगितले.

“त्यांच्याबद्दल जी भाषा वापरली जाते, त्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न केला जातोय, त्याचा कोणालाही फायदा होणार नाही” असे मोदी म्हणाले.

आणखी वाचा- देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं – पंतप्रधान

नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनामध्ये पंजाब राज्यातील शेतकऱ्यांचा मोठया प्रमाणावर समावेश आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकार असंवेदनशीलता दाखवत असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख समाजाचे कौतुक  केले.

आणखी वाचा- “तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे”; मोदींचा काँग्रेसचा टोला

कृषी कायद्यांवर मोदींनी सोडलं मौन

गेल्या दोन महिन्यांपासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. नवे कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून, विरोधकांकडूनही मागणी केली जात आहे. कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं. पंतप्रधानांनी कृषी मंत्र्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा हवाला देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

आणखी वाचा- भारतीय लोकशाही पाश्चिमात्य नव्हे, मानवी संस्था आहे; मोदींचा परदेशी सेलिब्रेटिंना टोला

“अध्यक्ष महोदय, अनेक आव्हानं आहेत. पण, समस्येचा भाग व्हायचं की, समाधानाचा? हे आपल्याला ठरवावं लागेल. छोटी रेषा आहे. जर समस्येचा भाग बनलो तर राजकारण होईल. समाधानाचा भाग झालो तर राष्ट्राच्या धोरणाला चार चाँद लागतील. वर्तमान पिढीबरोबरच नव्या पिढीचाही विचार करणं, हे आपलं दायित्व आहे. समस्या आहेत, पण सोबत काम केलं तर निश्चित यश मिळवू,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.