करोना प्रतिबंधक लसी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मोठे आणि महत्त्वाचे विधान केले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. करोना प्रतिबंधक लसीसाठी देशाला आता जास्त काळ वाट पाहण्याची आवश्यकता नाही असे मोदी म्हणाले.

पण त्याचवेळी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करताना दुर्लक्ष करु नका असे आवाहनही केले. “मागच्या काही दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लसीकडे लागले आहे. मी शास्त्रज्ञांची भेट घेतली आहे. लसीसाठी देशाला आता जास्त काळ थांबण्याची आवश्यकता नाही” असे मोदी म्हणाले.

“संसर्ग रोखण्यासाठी आपल्याबाजूने दुर्लक्ष करुन चालणार नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक आहे” असे मोदी म्हणाले.

“सध्या जगभरात विविध कंपन्या करोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे. भारतात सुरू असलेलं संशोधन आता काही आठवड्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच संशोधकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लसीचे वितरण सुरू होईल. लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक आहे. केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल”, असे पंतप्रधान मोदींनी तीन दिवसांपूर्वी सांगितलं.