भारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याला मुंबईतील विशेष न्यायालयाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देण्यासाठी मल्ल्याला आणखी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे. ईडीने या अर्जाद्वारे मल्ल्याला आर्थिक गुन्ह्यातील फरार आरोपी घोषित करण्याची मागणी केली होती. मल्ल्यानेच न्यायालयात अर्ज करून उत्तर देण्यासाठी काही वेळ मागितला होता.

मल्ल्याला त्याचे उत्तर देण्यासाठी २४ सप्टेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर न्यायालय यावर सुनावणीचा निर्णय घेईल. तत्पूर्वी २७ ऑगस्टला सुनावणी दरम्यान ३ सप्टेंबर तारीख निश्चित करण्यात आली होती. यापूर्वी याच न्यायालयाने ३० जूनला मल्ल्याला समक्ष हजर राहण्यासही सांगितले होते.

कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक असलेल्या मल्ल्यावर विविध बँकांना सुमारे ९९९० कोटी रूपयांचा चुना लावून फरार झाल्याचा आरोप आहे. सध्या मल्ल्या लंडनमध्ये असून तिथे त्याच्याविरोधात भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी खटला सुरू आहे.

आर्थिक गुन्ह्यातील फरार म्हणजे काय

नव्या नियमानुसार ज्याला आर्थिक गुन्ह्यातील फरार आरोपी घोषित केले जाते, त्याची संपत्ती त्वरीत जप्त केली जाते. ज्याच्याविरोधात सूचीबद्ध गुन्ह्यांसाठी अटकेचे वॉरंट जारी केले जाते, तो आर्थिक गुन्हेगार ठरतो. त्याचबरोबर जर अशा व्यक्तीने देश सोडलेला असेल किंवा येथील कारवाईपासून वाचण्यासाठी तो विदेशात गेला असेल. या कारवाईपासून वाचण्यासाठी भारतात येण्यास मनाई करत असेल तर या अध्यादेशानुसार १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त धोकेबाजी, चेक बाऊन्स आणि थकीत कर्जप्रकरणांचा यात समावेश होतो.