जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या एका स्थानिक तरुणाला लष्कराच्या जीपला बांधल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले तसेच ड्युटीवर असताना कामाच्या ठिकाणी हजर न राहता श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये स्थानिक महिलेसोबत आढळून आल्याने चर्चेत आलेले मेजर लीतुल गोगोई यांना श्रीनगरच्या न्यायालयाने झटका दिला आहे. न्यायालयीन चौकशीत हॉटेल प्रकरणामध्ये गोगोई दोषी ठरले असून न्यायालयाने त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
Major Leetul Gogoi was detained by the Jammu and Kashmir Police from a hotel with a woman on May 23. He was allegedly involved in a brawl with the woman at the hotel. https://t.co/Yk0oQUtLP8
— ANI (@ANI) August 27, 2018
जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले लष्करी अधिकारी लीतुल गोगोई २३ मे रोजी श्रीनगरमधील हॉटेलमध्ये एका महिलेसोबत आढळून आले होते. आपल्या कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करुन ते हॉटेलमध्ये सापडल्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने आपला अहवाल एक्स व्ही कॉर्प्सकेड पाठवला होता. त्यानंतर आता समितीने त्यांना दोषी मानत लष्कराला शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत.
एका ब्रिगेडिअर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने मेजर गोगोई यांचा जबाबही नोंदवला होता. चौकशीदरम्यान, संबंधित दस्ताऐवजांची तपासणी केल्यानंतर इतर लष्करी अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवण्यात आले होते.
दरम्यान, आता मेजर गोगोई दोषी ठरल्याने त्यांच्यावर आर्मी अॅक्टनुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शल होण्याची शक्यताही असल्याचे सुत्रांकडून कळते. यापूर्वी २६ मे रोजी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पहलगाम येथे सांगितले होते की, अगर मेजर गोगोई यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना शिक्षा दिली जाईल. ही शिक्षा देखील अशी असेल की ते एक उदाहरण ठरेल.