दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. युगांडाच्या महिलेने तक्रार केल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.  भारती यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह महिलेच्या घरी छापा घातल्याचा आरोप आहे.
 या प्रकरणी पोलिसांकडे काही तक्रार आली होती काय याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश त्यांनी दक्षिण दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांना अहवाल देण्यास सांगितले आहे. सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसने या प्रकरणी भारती यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नायब राज्यपालांकडे केली आहे. भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दिल्ली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून १९ जानेवारीला अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता आणखी एका महिलेने अ‍ॅड. राकेश शेरावत यांच्यामार्फत तक्रार केली आहे. त्यात जमावाने आपल्याला बहिणीसोबत हाताला धरून घराबाहेर काढून, गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
राज्यपालांनी या प्रकरणी भारती यांच्याविरोधात कारवाईसाठी पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दिल्ली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांनी या संदर्भात गुरुवारी भेट घेतली. सोमनाथ भारती यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. सोमनाथ भारती यांच्यामुळे निर्माण झालेल्या वादावर या भेटीत चर्चा झाल्याचे मानले जात आहे. या वादाबाबत प्रतिक्रिया देण्याचे भारती यांनीही टाळले आहे.