सध्या संपूर्ण देशात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउनदरम्यान करोनाच्या वाढत्या संख्येला काही प्रमाणात आळा बसला असला तरी दररोज रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. भारतात आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या तब्बल ५० हजारांवर गेली आहे. यादरम्यान एम्सचे अध्यक्ष डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “सध्या दोन गोष्टींकडे प्रामुख्यानं पाहण्याची गरज आहे. जशी जशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, तसं आपण चाचण्याही वाढवत आहोत. जर आपल्याला या लढाईत यशस्वी व्हायचं असेल तर चाचण्या कितीही वाढल्या तर करोनाग्रस्तांच्या केसेस कमी होणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल,” असं गुलेरिया म्हणाले.

“आपल्याला लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. ज्या प्रमाणात या केस वाढल्या असत्या त्या प्रमाणात त्या वाढल्या नाहीत. जे देश आपल्यासोबत होते त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात केसेस वाढल्या आहेत. लोकांना कोविड रुग्णालय, डॉक्टरांना प्रशिक्षण आणि वेळ मिळाला आहे,” असंही गुलेरिया यांनी नमूद केलं. “येत्या महिन्यांमध्ये करोनाचं संक्रमण झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ पाहायला मिळेल. जून आणि जुलैमध्ये करोनाचं संक्रमण पीकवर म्हणजेच वेगानं वाढेल. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतरच करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ रोखली जाईल किंवा ती संख्या कमी होईल. सरकारला कोविड सेंटर्स, चाचण्यांमध्ये वाढ आणि हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या ठिकाणी कठोरपणे नियमांचं पालन करणं सरकारला सुरू ठेवावं लागेल,” असंही त्यांनी नमूद केलं.

जनतेचं सहकार्य आवश्यक

करोनाविरोधातील लढाई ही जनतेची लढाई आहे. अशा परिस्थितीत जनतेनं सहकार्य करणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटाझर, सतत हात धुणं अशा काही गोष्टींचं कटाक्षानं पालन करावं लागणार आहे. ही लढाई फार मोठ्या कालावधीसाठी चालणारी लढाई आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करणं आवश्यक आहे. मॉल, चित्रपटगृहांमध्ये जाताना नवे नियम म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

नियमांचं पालन केल्यास संख्या कमी

“सध्या चाचण्या आणि करोनाग्रस्तांची संख्येचं प्रमाण सध्या पूर्वीएवढंच आहे. लॉकडाउनच्या नियमांचे योग्यरित्या पालन केल्यास करोनाचा ग्राफ कमी करण्यास मदत होऊ शकते. करोनाची लढाई मोठी असून आपला दैनंदिन जगण्याची पद्धतही मोठ्या कालावधीसाठी बदलणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. सध्या अनेक औषधांवर संशोधन सुरू आहे. यामध्ये काही मॉलिक्यूलर औषधंही आहेत. तर लसीवरही संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले.