गेल्या काही दिवसांमध्ये न्यूझीलंडनं आपल्या देशात करोनावर नियंत्रण मिळवलं होतं. तसंच देश करोनामुक्त झाल्याचंही न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. परंतु तब्बल १०२ दिवसांनंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण सापडले आहे. त्यानंतर प्रशासनानं त्वरित कारवाई करत देशात कडक लॉकडाउन लागू केला आहे. ऑकलंडमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, यानंतर ऑकलंडमध्ये पूर्ण लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. तर देशातील इतर भागांमध्ये लेव्हल २ चं लॉकडाउन लागू करण्यात आलं आहे. एकीकडे संपूर्ण जगात करोनानं थैमान घातलं आहे. तर दुसरीकडे एक न्यूझीलंडकडे या महामारीचा सामना केल्याबद्दल एक उदाहरण म्हणून पाहिलं जातं. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मार्च महिन्याच्या अखेरिसच देशात कडक लॉकडाउन जाहीर करत करोनावर नियंत्रण मिळवलं. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये केवळ १०० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी न्यूझीलंडमध्ये करोनाबाधित एकही रूग्ण न सापडून १०० दिवस पूर्ण झाले होते.

गेल्या तीन महिन्यांमध्ये सराकानं उचललेल्या पावलांमुळे देशात कमी लोकांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी काही परदेशातून आले होते. त्यांनी सीमेवरच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. “हे उत्तम विज्ञान आणि राजकीय नेतृत्वाचं कौशल्य आहे. ज्या देशांनी करोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्या ठिकाणी विज्ञान आणि उत्तम राजकीय नेतृत्व याचा ताळमेळ पाहायला मिळतो,” असं मत ‘युनिव्हर्सिटी ऑफ ओटागो’मधील करोना महामारीचे तज्ज्ञ प्रोफेसर मायकल बेकर यांनी व्यक्त केलं.