देशात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी देखाल अद्यापही नवीन करोनाबाधित आढळून येतच आहेत. तर, देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशभरात ५० हजार ४० नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ५७ हजार ९४४ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, १ हजार २५८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील एकूण बाधितांची संख्या ३,०२,३३,१८३ झाली आहे. आजपर्यंत २,९२,५१,०२९ रूग्ण बरे झाले असून, ३,९५,७५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. देशातील अॅक्टिव केसेसची संख्या ५,८६, ४०३ झाली आहे. देशातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.७५ टक्के आहे.

दरम्यान, देशात जून महिन्यात करोनाच्या रोज १८ लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४० कोटींचा टप्पा ओलांडला गेला आहे, अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली आहे.

तसेच, देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

याचबरोबर, करोनाच्या Delta Plus Variant ची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. करोना विषाणूच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी या प्रकाराची धास्ती घेतली असताना भारतातल्या १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधित २० रुग्ण आत्तापर्यंत आढळून आल्यामुळे चिंता वाढली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट जगभरात आजपर्यंत सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातल्या नागरिकांनी देखील मास्क घालून ठेवणं आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.