करोना एका टप्प्यानंतर संपेल, परंतु जोपर्यंत आपण भविष्याबद्दल गांभिर्याने विचार करत नाही, तोपर्यंत टीबी, तंबाखूचं सेवन, वायू प्रदूषण आणि अन्य फुफ्फसांचे आजार जे दरवर्षी कोट्यवधी लोकांचा श्वास व आयुष्य हिरावून घेत आहेत, ते सुरूच राहतील, असं जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अध्यक्ष टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि जपानच्या राजकुमारी अकिशिनो यांच्यासोबत ५१ व्या युनियन वर्ल्ड कॉन्फरन्स ऑफ लंग हेल्थ ऑन ऑल-स्टार्ट लाइनअपच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, आरोग्य ही पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. जीवन नाजूक आहे याची कोविड -१९ आपल्याला आठवण करून देतं. प्रत्येकास स्वच्छ व मुक्तपणे श्वास घेता यावा यासाठी, कोविड-१९ विरोधात जगाच्या सुरू असलेल्या लढाईत सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.

तर, कोविडमुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला, अर्थव्यवस्था कोलमडल्या व लाखोंचा जीव देखील गेला. ग्रहाचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी ही कॉन्फरन्स अगदी योग्य वेळेवर होत आहे. असं यावेळी क्लिंटन यांनी सांगितलं.

आजपासून बरोबर शतकापूर्वी टीबी व अन्य फुफ्फसांच्या आजारांचा नाश करण्यासाठी पॅरिसमधील या संस्थेची १९२० मध्ये स्थापना झाली होती. आज टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, टीबी जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य आजार आहे. दिवसाठीक ४ हजार मृत्यू यामुळे होत असल्याचा दावा आहे.