सुप्रीम कोर्टातील बंडाळी सरल्याचा दावा बार कौन्सिल केला असतानाच अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सुप्रीम कोर्टातील वाद अजून मिटलेला नाही, असे विधान केले आहे. आगामी काही दिवसांत हा वाद संपुष्टात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सोमवारीच वेणुगोपाल यांनी हा वाद शमल्याचे सांगितले होते.

सुप्रीम कोर्टातील चार वरिष्ठ न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने देशभरात खळबळ उडाली होती. सरन्यायाधीश मिश्रा हे महत्त्वाची प्रकरणे सुनावणीसाठी स्वत:कडे ठेवतात, किंवा त्यांच्या मर्जीतील न्यायाधीशांना देतात, असा त्यांचा आरोप होता. न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर, न्या. कुरियन जोसेफ या चार जणांनी न्यायपालिकेतील वादाला तोंड फोडले होते.

सोमवारी सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरु झाल्यावर चारही न्यायाधीशांनी नेहमीप्रमाणे कामकाजावर हजेरी लावली होती. चारही न्यायाधीशांनी नियमित कामकाज सुरु केले असून आता हे कथानक संपले आहे, जे घडले ते विसरुन जावे, असे सांगून बार कौन्सिलने सरन्यायाधीश आणि न्यायाधीशांमधील वाद मिटल्याचे जाहीर केले होते. न्यायाधीशांचे बंड हे चहाच्या कपातील वादळ होते. पण आता सगळे प्रश्न सुटले आहेत, असे वेणुगोपाल यांनी सांगितले होते.

मंगळवारी वेणुगोपाल यांनी या वादावर पुन्हा प्रतिक्रिया दिली. अद्याप हा वाद मिटलेला नाही. आगामी २ ते ३ दिवसांत वादावर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरन्यायाधीश किंवा चार न्यायाधीशांशी अद्याप चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.