सीआरपीएफच्या एका जवानामधील माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा जवान श्रीनगरमध्ये तैनात असताना एका अर्धांगवायू झालेल्या चिमुकल्याला आपल्या डब्यातील जेवण भरवत आहे. विशेष म्हणजे पुलवामात झालेल्या हल्ल्यावेळी सीआरपीएफच्या ताफ्यातील एका वाहनावर हा जवान वाहनचालक म्हणून कार्यरत होता.

https://twitter.com/ANI/status/1128227683685543936
हवालदार इकबाल सिंग असे या जवानाचे नाव असून श्रीनगरमध्ये रस्त्त्याच्या बाजूला एका बंद दुकानाबाहेर हा जवान अर्धांगवायू झालेल्या एका चिमुकल्याला आपल्या डब्यातील जेवण स्वतःच्या हाताने भरवता दिसत आहे. हवालदार सिंग यांनी आपल्या या कृतीमुळे एका आदर्श माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंततर हवालदार सिंग यांना सीआरपीएफच्या महासंचालकांकडून प्रशंसा प्रमाणपत्रानेही गौरवण्यात आले आहे. त्यांची ही कृती सीआरपीएफसाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद असल्याची भावना सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यावेळी सीआरपीएफच्या ताफात हवालदार सिंग हे जवानांचे वाहनचालक म्हणून कर्तव्यावर होते.