जगात अनेक ठिकाणी मुस्लिमांबद्दल द्वेष बाळगत नेहमी त्यांचा संबंध दहशतवादाशी जोडला जातो. दुर्दैवाने यामुळे अनेकदा मुस्लिमांना बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागत असतं. टेक्सास येथे अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये फक्त मुस्लिम नाव असल्या कारणाने एका वेटरला टिप देण्यास ग्राहकाने नकार दिला. ग्राहकाने बिलावर ‘आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही’ असं लिहिलं होतं. खलील केविल याने फेसबुकवरुन आपल्यासोबत घडलेली ही धक्कादायक घटना शेअर केली आहे.

या घटनेतील एक गोष्ट आश्चर्यकारक आहे. खलील केविल याचं फक्त नाव मुस्लिम असून तो ख्रिश्चन आहे. आपण एखाद्या विचारसरणीच्या किती आहारी जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे.

एका इन्स्टाग्राम युजरने घटनेचा निषेध केला आहे. ‘फेसबुवर खलील याने पोस्ट केली होती. अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या खलिल एका ग्राहकाने दहशतवादी म्हटलं आहे. आश्चर्य म्हणजे तो मुस्लिमच नाहीये. फक्त त्याचं नाव मुस्लिम आहे. हा सरळ सरळ वर्णभेद आहे. आपण कधी सुसंस्कृत होणार आहोत ?’, असं युजरने म्हटलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर मिळणाऱ्या समर्थनसाठी खलिल याने सर्वांचे आभार मानले आहेत.