बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘गज’ चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ आज तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. चेन्नईसह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली आहे. त्याधर्तीवर भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. गजचे आज तीव्र चक्रीवादळात (सिव्हिअर सायक्लोन) रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. आज दुपारी तामिळनाडूमधील कुड्डलूर आणि पम्बन यांच्यादरम्यान किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. २ महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता मोठी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गज वादळ ताशी १२ ते १५ किमी वेगाने तामिळनाडू व आंध्रकडे सरकत आहे. चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे हवान विभागाच्या अंदाजानुसार, गज या चक्रिवादाळामुळे महाराष्ट्राच्य़ा काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.