वायएसआर कॉंग्रेसचे नेते आणि कडप्पाचे खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी गेल्या १६ महिन्यांपासून जगनमोहन रेड्डी कारागृहात होते. जगनमोहन रेड्डी यांच्या सुटकेमुळे अखंड आंध्र प्रदेशच्या आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश यू. दुर्गाप्रसादराव यांनी दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर रेड्डी यांना जामीन मंजूर केला. रेड्डी यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय हैदराबाद सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याप्रकरणी साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.