देशभरात सध्या गाजत असलेल्या दादरी हत्याकांडासाठी गोमांस नव्हे तर प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचा खळबळजनक दावा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) करण्यात आला आहे. येत्या १ ते ३ नोव्हेंबरदरम्यान उत्तरप्रदेशातील सितापूर येथे ‘अभाविप’ची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ‘अभाविप’च्या नव्या दाव्यामुळे ही परिषद गाजण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून उत्तरप्रदेशातील दादरी येथे मोहम्मद अखलाख या व्यक्तीला गावातील जमावाने ठार मारले होते. यावेळी मोहम्मद यांचा मुलगा दानिश यालादेखील बेदम मारहाण करण्यात आली होती. मात्र, अखलाख यांच्यावरील हल्ला गोमांसाच्या वादातून झाला नसून त्यासाठी मोहम्मद यांच्या मुलांपैकी एकाचे हिंदू तरूणीशी असलेले प्रेमसंबंध कारणीभूत आहेत. मात्र, राजकारण्यांनी या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचे ‘अभाविप’चे म्हणणे आहे.
परिषदेच्या पहिल्यादिवशी ‘अनुनयाचे राजकारण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होत असलेल्या कार्यकर्त्यांकडून दादरी प्रकरणाविषयी प्रतिक्रियाही मागविण्यात येणार आहेत. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांना परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
मोहम्मद अखलाख यांच्याबरोबर त्यांच्या दानिश या मुलालाही मारहाण करण्यात आली होती, तर त्यांचा दुसरा मुलगा सरताज हा भारतीय वायूदलात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. या दोघांपैकी एकाचे हिंदू तरूणीशी प्रेमसंबंध होते. या वादातूनच संबंधित मुलीच्या कुटुंबाने अखलाख यांच्यावर हल्ला केल्याची चर्चा सध्या स्थानिक पातळीवरील प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्याची माहिती ‘अभाविप’चे प्रदेश सचिव सत्यभान यांनी दिली. मात्र, काही राजकीय पक्षांनी अल्पसंख्याकांचे लांगुलचालन करण्याच्या हेतूने अखलाख यांची हत्या गोमांसाच्या वादातून झाल्याचे सांगत याप्रकरणाला राजकीय वळण दिले. समाजवादी पक्षाचे मंत्री आझम खान यांनी हे प्रकरण थेट संयुक्त राष्ट्राकडे नेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन झाली. या सगळ्याविषयी ‘अभाविप’तर्फे परिषदेत स्पष्टीकरण देण्यात येईल, असेही सत्यभान यांनी सांगितले.