८३ तरुणांची यादी तयार केल्याच्या प्रकाराने गहजब; भीतीपोटी अन्य निदर्शकांचे वस्तीतून पलायन

मेरठचा शोभापूर परिसरात प्रामुख्याने दलित वस्ती असून या भागातील तरुणांनी गेल्या आठवडय़ातील ‘भारत बंद’दरम्यान आंदोलन केले होते. आता या तरुण आंदोलकांविरोधात उच्चवर्णीयांकडून बदला घेतला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दलित आंदोलकांची यादी उच्चवर्णीयांकडून तयार केली गेली असून त्यात ८३ तरुणांची नावांचा समावेश आहे. या यादीतील पहिले नांव गोपी परिया (२८) या बसपा कार्यकर्त्यांचे होते. त्याची गुरुवारी गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही यादी नेमकी कोणी तयार केली याचा तपास पोलीस करत आहेत.

गोपीचे वडील ताराचंद हेही बसपाचे नेते असून त्यांच्या तक्रारीवरून शोभापूरमधील मनोज गुज्जर, आशिष गुज्जर, कपिल राणा आणि गिरिधारी या चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी गोपीच्या शेजारी राहणारे मनोज आणि कपिल यांना अटक करण्यात आली आहे. ही यादी समाजमाध्यमावरून फिरवण्यात आली. यादीत नाव असल्याचे पाहिल्यानंतर अन्य दलितयुवक पसार झाले. गोपी मात्र इतरांबोरबर जाण्यास नकार दिला व तो वस्तीतच राहिला. त्याची जबर किंमत मोजावी लागली, असे त्याचे वडील ताराचंद यांनी सांगितले.

मेरठमध्ये चार दिवसांपूर्वी दलितांचे प्राबल्य असलेल्या शोभापूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला त्यावेळी पोलीस तपासणी नाक्याला आग लावण्यात आली होती. बुधवापर्यंत बहुसंख्य दलितांनी परिसर सोडला होता, मात्र आपला पुत्र न घाबरता तेथेच राहिला. त्यानंतर गोपीला मंदिरात बोलावले असल्याचा मित्राचा निरोप आला, विजय आणि रोहित या मित्रांसमवेत गोपी तेथे गेला. तेथे मनोज, कपिल, आशिष हजर होते त्याचप्रमाणे सुनील आणि अनिलही हजर होते. मनोजने प्रथम गोपीच्या छातीवर गोळी झाडली आणि त्यानंतर कपिल आणि आशिषने गोळ्या झाडल्या, असे प्रशांतने सांगितले. हल्लेखोरांनी आपल्याला जातीवाचक शिव्या दिल्या असे गोपीने मरण्यापूर्वी आपल्याला सांगितल्याचे ताराचंद यांनी सांगितले.