डोळ्यांसमोर पोलिसांनी पिकावर बुल्डोजर चालवल्याने दलित शेतकरी दांपत्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात ही घटना घडली आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जात होती. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला जात आहे. व्हिडीओमध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत असताना मुलांचा आक्रोश सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. राम कुमार आणि सावित्री देवी अशी या दांपत्याची नावं आहेत. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या प्रकृती स्थिर आहे. एनडीटीव्हीने यासंंबंधी वृत्त दिलं आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये सरकारने साडे पाच एकर जमीन कॉलेज उभारण्यासाठी राखीव ठेवली होती. पण राम कुमार आणि सावित्री देवी यांनी त्यावर अतिक्रमण केलं असून आपण अनेक वर्षांपासून येथे शेती करत असल्याचा दावा केला आहे. “ही कोणाची जमीन आहे आम्हाला माहिती नाही. आम्ही गेल्या कित्येक काळापासून या जमिनीवर शेती करत आहोत. आमच्या डोळ्यांसमोर पीक नष्ट केलं जात असेल तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही,” असं सावित्री देवी यांनी सांगितलं. आपल्यावर तीन लाखांचं कर्ज असून ते कोण फेडणार ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मंगळवारी महसूल विभागाचे काही अधिकारी पोलिसांसोबत जमिनीवर अतीक्रमण हटवून तेथे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी पोहोचले होते. यावेळी दांपत्याने त्यांना कारवाई करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. कारवाईदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी पीक नष्ट केलेलं पाहून अखेर त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी राम कुमार आणि सावित्री देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

“आम्ही घटनेचा तपास केला असून व्हिडीओची पाहणीदेखील केली आहे. दांपत्याने विष प्राशन करताच पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं,” अशी माहिती जिल्हाधिकारी एस विश्वनाथ यांनी दिली आहे. जर पोलिसांनी तात्काळ मदत केली नसती तर दांपत्याचा मृत्यू झाला असता असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यावर कारवाईचा आदेश दिला असून उच्चस्तरीय चौकशीचाही आदेश आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर टीका करताना राज्यात ‘जंगल राज’ असल्याचं म्हटलं आहे. कमलनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “दलित दांपत्याला पोलिसांकडून निर्घृणपणे मारहाण करण्यात आली. हे कोणत्या प्रकारचं जंगल राज आहे ? जर हा सरकारी जमिनीचा मुद्दा होता तर तो कायदेशीर मार्गाने सोडवता आला असता. पण पती, पत्नी आणि मुलांना मारहाण करणं हे योग्य नाही. जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे”.