पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून सातत्याने द्वेष, तिरस्कार आणि भीती पसरवली जाते. या सगळ्याचे उत्तर प्रेम आणि आपुलकी असेच आहे असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण आक्रमक ठरले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देत त्यांनी घेतलेल्या गळाभेटीची खिल्ली उडवली. या सगळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे ट्विट समोर आले आहे. देश कधीही भीती, द्वेष आणि तिरस्काराने जोडला जात नाही. प्रेम आणि आपुलकीनेच जोडला जातो असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

प्रेम आणि आपुलकीनेच देशवासीयांची मने जिंकता येतात. तिरस्कार, भीती आणि द्वेष यानेही काहीही साध्य होत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अविश्वास ठराव मांडल्यानंतर जे मतदान झाले त्यात एनडीएला ३२५ मते मिळाली त्यांनी बहुमत जिंकले या निर्णयाचा आदर करतो असेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. मात्र महात्मा गांधी यांच्या एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करायचा या धोरणाशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी आजही केला.

लोकसभेत राहुल गांधी ४५ मिनिटे बोलले. त्या दरम्यान सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला. राफेल करार, नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी, महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. त्यानंतर मी हिंदू आहे हे देखील आपल्या भाषणात ठासून सांगितले. इतकेच नाही तर संघ आणि भाजपा मला पप्पू समजते पण मी त्यांचा तिरस्कार करत नाही असेही म्हणायला ते विसरले नाहीत. पुन्हा एकदा आजही त्यांनी प्रेम आणि आपुलकीचीच भाषा करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहुल गांधी यांनी घेतलेली  गळाभेट हा दिवसभर चर्चेचा विषय ठरला. अशात आता आजही मोदींच्या विरोधात ट्विट करत राहुल गांधी यांनी प्रेम आणि आपुलकीने देश जोडणार असल्याचे स्पष्ट केले.