कुठल्याही व्यक्तिच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तिला अंत्यविधीसाठी खांद्यावरुन किंवा रुग्णवाहिकेतून नेले जाते. पण चेन्नईच्या विरुगामबाक्कममध्ये अंत्यविधीची एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. घरातल्या वयोवुद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एक जोडपे त्या महिलेचा मृतदेह बाईकवर बसवून अंत्यसंस्कारासाठी घेऊन चालले होते. कन्नन (५५) आणि त्याची पत्नी शांतीने मृतदेह बाईकवर बसवल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी बाईक अडवून चौकशी केल्यानंतर कन्नने सांगितेल कि, मृत महिला आपली आई असून आपल्याकडे अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने आपण बाईकवरुन आईचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन चाललो आहोत. ५५ वर्षीय कन्नन शेतकरी आहे. आईच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराठी आपण नातेवाईकांकडे मदत मागितली पण कोणीही मदत केली नाही. त्याचा मोठा मुलगा अरुण कुमार टॅक्सी चालवतो. पण लग्न झाल्यानंतर त्याने कुटुंबाशी संपर्क तोडून टाकला असे कन्नने सांगितले.

सध्या आपले कुटुंब लहान मुलगा अजित कुमारवर अवलंबून आहे तो सुपर मार्केटमध्ये नोकरी करतो असे कन्नने सांगितले. कन्नन आणि त्याची पत्नी मुलासोबत राहण्यासाठी म्हणून शहरामध्ये आले. ते एका इमारतीत भाडयाच्या घरात राहतात. पण त्या इमारतीत शेजारी त्यांच्याशी बोलत नाहीत.

कन्नची आई भुवनेश्वरी ८५ वर्षांच्या होत्या. रविवारी त्यांचे निधन झाले. पैसा नसल्यामुळे पती-पत्नीने घरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीमध्ये मृतदेहाचे दफन करायचे ठरवले. ते मृतदेह बाईकवर बसवून दफनभूमीच्या दिशेने चालले असताना पोलीस दाखल झाले व त्यांनी चौकशी सुरु केली. पोलिसांचा संशय दूर झाल्यानंतर त्यांनी या जोडप्याला दफनविधीसाठी मदत केली.