केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पद्धतीत बदल करण्याबाबत केंद्र सरकार येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी दिली.
याबाबत येत्या दोन ते तीन दिवसांच्या आत सरकार निर्णय घेईल. जो काही निर्णय आम्ही घेऊ, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला विश्वासात घेतले जाईल, असे सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सनदी सेवांसाठीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धतीत बदल करण्याची मागणी केल्याने कार्मिक मंत्रालयाने भारतीय प्रशासकीय सेवेची प्राथमिक परीक्षा पुढे ढकलण्याविषयी आयोगाकडे विचारणा केली होती. २०१४ मधील सनदी सेवांची प्राथमिक परीक्षा येत्या २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. यासंदर्भात लक्ष घालण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सनदी सेवा परीक्षा देणाऱ्या इच्छुकांच्या मागणीनुसार ‘सिव्हिल सव्‍‌र्हिस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट’मध्ये बदल हवा आहे. विद्यार्थ्यांच्या मते या चाचणीत भारतातील ग्रामीण भागांसह इतर प्रदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला समान संधी मिळायला हवी.
या मागणीसाठी दिल्लीतील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. प्राथमिक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी त्यांनी केली होती.

समानसंधीसाठी रस्त्यावर
प्रत्येकी २०० गुणांचे दोन पेपर, यातील एक सीसॅट-१ आणि सीसॅट-२ या दोन पेपरचा समावेश आहे. तसेच सी-सॅट-२ मध्ये आकलन, तसेच संवाद कौशल्य आणि तर्कशास्त्राचा तसेच विश्लेषण क्षमतांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे मत असे आहे की आयोगाने प्रादेशिक भाषांना महत्त्व न देता इंग्रजीवर अधिक भर दिला आहे आणि पेपरमधील काही प्रश्नांचा अनुवाद अत्यंत कठीण हिंदीत करण्यात आला आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषेतील ज्ञान जास्त असूनही केवळ भाषेच्या मुद्दय़ावर विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत.