देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. भारतातील या लाटेत विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे करोना मृत्यूची संख्या वाढत असल्याचं दृश्य आहे. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार ८७४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात दोन लाख ७६ हजार ७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ६९ हजार ७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, देशभरात करोनाची दुसरी लाट ओसताना दिसत आहे. गेल्या २४ तासात २ लाख ७६ हजार ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला ही संख्या तीन लाखांच्या आसपास होती. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेल्या २४ तासांत ३,८७४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी देशात करोनाबळींचा नवा उच्चांक गाठला होता. मंगळवारी देशभरात चार हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या देशात ३१ लाख २९ हजार ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही २ लाख ८७ हजार १२२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत २ कोटी ५७ लाख ७२ हजार ४०० जणांना देशात करोनाची लागण झाली आहे तर २ कोटी २३ लाख ५५ हजार ४४० रुग्णांनी करोनावर मात केली आहे.