वॉशिंग्टन : भारतीय व अमेरिकी राजनैतिक अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवाळी उत्साहात एकत्रित साजरी केली. दोन्ही देशांतील मजबूत संबंध यातून स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.

भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना व उप परराष्ट्रमंत्री जॉन सुलिवान हे फॉगी बॉटम या परराष्ट्र खात्याच्या मुख्यालयात झालेल्या दिवाळीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. सुलिवान यांनी सांगितले, की  एकत्रितपणे दिवाळी साजरी करण्यातून भारत व अमेरिका यांच्यात सहिष्णुता, विविधता, स्वातंत्र्य व न्याय या लोकशाही तत्त्वांचे सामर्थ्य आणखी वाढले आहे. एकूण २०० पाहुणे या वेळी उपस्थित होते. अमेरिकी परराष्ट्र खाते व भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता.

अमेरिकी परराष्ट्र खात्याने या वेळी प्रथमच भारतीय दूतावासाच्या सहकार्याने दिवाळी उत्सवाचे आयोजन केले होते. राजदूत सरना यांनी सांगितले, की परराष्ट्र खात्यात साजरी होत असलेली दिवाळी ही भारत व अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधाचे प्रतीक आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकी लोकांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे. अमेरिकेने २०१६ मध्ये दीपावलीनिमित्त टपाल तिकीटही जारी केले होते. दोन्ही देशांत काही सांस्कृतिक साम्यस्थळेही आहेत.

अमेरिकेचे अधिकारी सुलिवान यांनी दिवाळीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. भारतीय दूतावास व दक्षिण आशियाई अमेरिकन कर्मचारी संघटना यांनी दिवाळी कार्यक्रमाचे शानदार आयोजन केल्याचे सांगून ते म्हणाले, की वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय हा दोन्ही देशांना एकत्र आणणारा समान धागा आहे. दिवाळीत एक आशेचा संदेश आहे. या वेळी हिंदुस्थानी अभिजात संगीतातील तबला व सतारवादनाचे कार्यक्रम झाले.