लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अबु दुजाना याचा जम्मू काश्मीरमध्ये खात्मा केल्यानंतर सैन्य अधिकारी कर्नल पंकज नौडियाल चर्चेत आले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेची त्यांची ऑडिओ क्लीप लीक झाली आहे. खतरनाक दहशतवादी अबु दुजाना याला यमसदनी धाडणाऱ्या ५५ राष्ट्रीय रायफल्सच्या युनिटचे कर्नल पंकज नौ़डियाल हे कमांडिंग ऑफिसर आहेत.

सोशल मीडियात ही टेप व्हायरल झाली असून यामध्ये कर्नल पंकज नौडियाल यांनी सैन्याच्या अधिकाऱ्यांसोबत केलेली सर्व चर्चा यात ऐकायला मिळत आहे. त्यानुसार, ३१ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत अबु आणि त्याचा एक साथीदार पुलवामामधील एका गावात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार तो थांबणार असलेल्या घराच्या मालकाला आम्ही विश्वासात घेतले आणि पुलवामा पोलिसांच्या मदतीने पूर्ण घराला वेढा दिला. घर मालकाला त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर त्याने अबुसोबत संपर्क साधला.

नौडियाल यांनी सांगितले की, अबुला शरण येण्यास सांगण्यात आले मात्र, त्याने याला नकार दिला. दरम्यान त्याने हे मान्यही केले की, या मोठ्या खेळात आपला एखाद्या प्याद्याप्रमाणे वापर होत आहे. मात्र ज्यांना खेळायचे आहे त्यांनी खेळावे मी मात्र जिहादसाठी लढतोय. फोनवरील या चर्चेमुळे पाकिस्तानचा चेहरा उघडा पडला असून त्यामुळे काश्मीरच्या जनतेमध्ये भारतीय सैन्याचा विश्वासही वाढल्याचा दावाही नौडियाल यांच्या क्लीप प्रकरणामुळे समोर आला आहे.

नौडियाल यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, लहानपणापासूनच पंकजचे लष्करात जाण्याचे स्वप्न होते. त्याचे वडिल सीताराम नौडियाल हे पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर होते. दिल्ली विद्यापीठातून बीकॉम केल्यानंतर त्याने ‘सी़डीएस’ची परीक्षा दिली आणि त्यांनतर त्याची ‘आयएमए’साठी (इंडियन मिलिटरी अॅकॅडमी) निवड झाली.