सोफी एहसान

अनेक वापरकर्त्यांनी त्यांच्या समाज माध्यम व्यासपीठांवर एका महिलेची तिच्या संमतीविना अपलोड केलेली आक्षेपार्ह छायाचित्रे काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गूगल आणि फेसबुकला दिले आहेत. या वापरकर्त्यांमध्ये दिल्लीच्या शाळेतील तिच्या एका शालेय वर्गमित्राचाही समावेश आहे. ही महिला ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना तो तेथे गेला होता आणि काही वर्षांपूर्वी त्याने तिच्यावर हल्लाही केला होता.

बाल लैंगिकतेबाबतचे साहित्य आपल्या व्यासपीठांवरून प्रसारित केले जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी समाज माध्यम व्यासपीठांनी उपलब्ध असलेली परिणामकारक पावले उचलणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. भारतात अशा प्रकारचे साहित्य जे लोक पुन्हा अपलोड करीत आहेत त्यांचा पोलीस शोध घेतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सध्या ही महिला २४ वर्षांची असून तिने विविध व्यासपीठांवर टाकण्यात आलेली आक्षेपार्ह छायाचित्रे काढून टाकण्याचे आदेश द्यावेत यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र अद्यापही अनेक व्यासपीठांवरून ही आक्षेपार्ह छायाचित्रे काढून टाकण्यात आलेली नाहीत, ही बाबही तिने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

जुलै २०२० मध्ये फेसबुक आणि गूगलने यूआरएल (वेब पत्ते) काढून टाकल्याचे न्यायालयास सांगितले, मात्र अनेक वापरकर्त्यांमार्फत छायाचित्रे महाजालावर येतच राहिली, त्यामुळे व्यासपीठांवर आक्षेपार्ह छायाछित्रे वितरित करण्यास प्रतिबंध करण्यात समस्या येत असल्याचे समोर आले, असे न्या. विभू बाखरू यांनी म्हटले आहे.