झारखंडमध्ये राहणारी १६ वर्षांची सोनी…दिल्लीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून कुटुंबाला पैसे पाठवता यावे म्हणून दिल्लीत आली.. पण दिल्लीत तिच्या नशिबी यातनाच आल्या..थकवलेल्या पगाराची मागणी करताच तिची हत्या करण्यात आली असून तिच्या शरीराचे १० तुकडे करण्यात आले होते.  या हत्याकांडाने दिल्लीत खळबळ उडाली असून घरकाम करणाऱ्या महिलांचे होणारे शोषण हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झारखंडमधील एका गावात राहणारी सोनी कुमारीच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबासमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न होता. अशा स्थितीत सोनी कुमारीच्या भावाची राकेश नामक तरुणाशी ओळख झाली. तुझ्या बहिणीला दिल्लीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो. राहायला एसी खोली आणि दररोज मोफत जेवण मिळेल, असे आमिष राकेशने त्याला दाखवले. राकेशवर विश्वास ठेवून सोनी कुमारीच्या भावाने तिला दिल्लीत पाठवले. पण दिल्लीत आल्यावर सोनी कुमारीच्या नशिबी यातनाच होत्या.

सोनी कुमारी मानव तस्करी करणाऱ्या टोळीच्या जाळ्यात अडकली होती. राकेश सोनीकुमारीला घेऊन मनजितकडे गेला. मनजित हा घरकाम करणाऱ्या महिलांची एजन्सी चालवतो. त्याने सोनी कुमारीला दिल्लीतील विविध घरांमध्ये घरकाम करायला भाग पाडले. एका व्यावसायिकाच्या घरात ती काम करत होती. पण पैसे न मिळाल्याने सोनी कुमारीने तिथून पळ काढला आणि ती  मनजितच्या एजन्सीत पोहोचली. तिने पगाराचे थकवलेले पैसे मागितले. मनजित व त्याच्या साथीदारांनी सोनी कुमारीचे तब्बल २ लाख रुपये थकवले होते. मला पगाराचे पैसे दिले नाही तर मी पोलिसांकडे तक्रार करणार, अशी धमकी तिने दिली होती.

सोनीच्या या धमक्यांमुळे मनजित संतापला होता. अखेर त्याने सोनीच्या हत्येचा कट रचला. जवळपास आठवडाभर मनजित हा कट रचत होता. ३ मेरोजी मनजितने सोनीला एका घरात नेले. ते घर मनजितने भाड्याने घेतले होते. त्या घरात गौरी आणि शाहू हे राहत होते. गौरीदेखील घरकाम करायची. मनजितने सोनीची हत्या केली. यानंतर जवळपास तीन तास त्या तिघांनी सोनीच्या मृतदेहाचे १० तुकडे केले. यानंतर त्यांनी घरातील रक्ताचे डाग पुसले आणि प्लास्टीकच्या पिशवीत भरुन तिच्या मृतदेहाचे तुकडे निर्जनस्थळी फेकून दिले.

दुसऱ्या दिवशी एका स्थानिकाला पिशवीत मृतदेहाचे तुकडे असल्याचे निदर्शनास आले. त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात दोन जण पिशवी घेऊन जाताना दिसले. रेखाचित्रांच्या आधारे पोलीस शाहूच्या घरापर्यंत पोहोचले. मात्र, शाहू आणि गौरी पसार झाले होते. हे घर कोणी भाड्याने घेतले याचा पोलिसांनी तपास केला. यात मनजितविषयी माहिती समोर आली आणि पोलीस चौकशीत मनजितचे हे क्रूरकृत्य उघड झाले. आता पोलीस शाहू, गौरी आणि राकेशचा शोध घेत आहेत. राकेशचा या हत्याकांडात सहभाग होता का, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi 16 year old domestic helper murdered for demanding salary body chopped off into 10 pieces
First published on: 22-05-2018 at 14:59 IST