गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून आंदोलन करतोय. आंदोलनावेळी कधीही, कुठलाही हिंसाचार झालेला नाही. पण हे सरकार रामलीला मैदानावर आंदोलनासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बसेस, रेल्वे रोखत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आमच्या आंदोलनात अडथळे आणले जात आहेत, असे म्हणत सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. जनलोकपालची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी अण्णा हजारे हे रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. तत्पूर्वी, माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

राजघाट येथील महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळावर दर्शन घेण्यासाठी जाण्यापूर्वी हजारे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, आंदोलनात येणाऱ्या लोकांशी गैरवर्तणूक केली जात आहे. त्यांना आंदोलनात येण्यापासून रोखले जात आहे. आमच्या आंदोलनात खोडा घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. देश व लोकशाहीसाठी भगतसिंग यांनी बलिदान दिले. इंग्रज गेले पण देशात लोकशाही काही अजून आलेली नाही. त्यांचे लोकशाहीचे स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे सरकार आमचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही भगतसिंगांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आतापर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण सरकारला काय अनुभूती आली काय माहीत असा सवाल उपस्थित करत आमच्या लोकांच्या बसेस आणि रेल्वे रोखण्यात येत असल्याचा आरोप केला. लोकशाहीसाठी हे ठीक नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून सुरु होणारे आंदोलन थांबवावे, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची मदत घेत अण्णा हजारेंना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. महाजन यांनी सोमवारी हजारेंची भेटही घेतली होती. देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असे सुनावत हजारेंनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले होते.