दिल्लीच्या अशोक विहारमधील फेज-३च्या सावन पार्क कॉलनीत बुधवारी सकाळी एक ४ मजली जुनी इमारत कोसळली, यामध्ये अनेक लोक गाडले गेले आहेत. अनेकांना बाहेर काढण्यात आले मात्र, यातील पाच जणांनी बाहेर काढल्यानंतर आपले प्राण सोडले. यामध्ये ४ लहान मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. तर, इतर लोक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


कोसळलेली इमारत सुमारे २० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत असून ती राहण्यालायक राहिली नव्हती. इमारत कोसळल्यानंतर त्यातील ढिगाऱ्याखाली १५ पेक्षा अधिक लोक अडकले होते. ही दुर्घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. ११ वाजेपर्यंत सुमारे ९ लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले. या लोकांची प्रकृती गंभीर असल्याने यातील ५ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी ५ ते ६ लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इमारत कोसळल्यानतंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आरडा-ओरडा सुरु झाला. काही महिला यावेळी आपल्या कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याचे सांगत मोठ मोठ्याने रडत होत्या. याची माहिती कळताच दिल्लीतील अग्निशामक दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वेगाने बचाव कार्याला सुरुवात झाली.

पोलिसांच्या माहितीनुसार, जखमींच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून अद्याप ताजी माहिती उपलब्ध झालेली नाही. ही इमारत कशी कोसळली, त्यामागील कारणे काय आहेत याची माहिती बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतरच मिळू शकणार आहे. त्यानंतर याचा तपास करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi building collapses in sawan park 5 killed rescue ops underway
First published on: 26-09-2018 at 14:43 IST