सन २०१० मध्ये दिल्ली येथिल प्रसिद्ध जामा मशीद येथिल स्फोट आणि गोळीबार प्रकरणी आज दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचा सदस्य यासीन भटकळ याच्याविरोधात आरोप निश्चिती केली आहे. या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयात २३ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.


याप्रकरणी यापूर्वी न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचे तीन सदस्य सैय्यद इस्माइल आफाक, अब्दुस सबूर आणि रियाज अहमद सईदी यांना आरोपमुक्त केले होते. या तिघांविरोधात पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले होते.

इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळ याच्यासह संघटनेच्या तीन सदस्यांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. दिल्लीत झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स दरम्यान परदेशी खेळाडूंना आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी या आरोपींनी स्फोट घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

दरम्यान, १९ सप्टेंबर २०१० रोजी जामा मशीदीजवळ एक स्फोट झाला होता. या स्फोटाआगोदर इंडियन मुजाहिद्दीनच्या दोघा जणांनी एका बसवर गोळीबार केला होता, ज्या बसमधून परदेशी नागरिक उतरत होते.