05 March 2021

News Flash

सरकारला सत्तेची नशा, पंतप्रधानांना शेतकऱ्यांची चिंता नाही; काँग्रेसचा गंभीर आरोप

आपल्या चार पाच मित्रांनीच २०-२५ लाख कोटी रूपयांचं कमोडिटी मार्केट चालवावं असं पंतप्रधानांना वाटत असल्याचा आरोप

शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागलं आहे. केंद्र सरकारनं दिलेले प्रस्ताव शेतकऱ्यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसंच आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार नाही. सरकारनं आपल्याला रामलीला मैदान किंवा जंतरमंतरमध्ये आंदोलन करण्याची परवानगी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसनंही सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्यानं नव्या कायद्यांचं समर्थन करताना दिसत आहेत यावरून सरकारला सत्तेची नशा असल्याचं दिसत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.

दरम्यान, सरकारनं त्वरित तिन्ही कृषी कायदे रद्द करावे अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. “भारतातील ६२ कोटी शेतकरी आणि शेतातील श्रमिकांच्या मुद्द्यावर पंतप्रधानांचा अहंकार आणि आडमुठेपणा आजच्या मन की बात मधून दिसून आला. संसदेनं पारित केलेले तिन्ही कायदे योग्य असल्याचे ते म्हणाले यावरून ते दिसून आलं,” असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“जेव्हा लाखो शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत दिल्लीनजीक आहेत अशावेळीही पंतप्रधान हे तिन्ही कायदे योग्य असल्याचं म्हणत आहे. यावरून सरकारला सत्तेची नशा असल्याचं दिसत आहेत. तसंच शेतकरी आणि श्रमिकांबाबत त्यांना कोणतीही चिंता नसल्याचं दिसत आहे,” असंही ते म्हणाले. “शेतकरी कायद्याच्या पुनर्विचारावरही त्यांचा आजपर्यंत आडमुठेपणा दिसून येत आहे. रविवारी पार पडलेल्या मन की बात या कार्यक्रमातही त्यांनी सांगितलं की या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना नवी संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यामुळे त्यांना नवे अधिकारही मिळणार आहेत,” असं सुरजेवाला म्हणाले.

अमित शाहंवर निशाणा

सुरजेवाला यांनी यावेळी अमित शाह यांच्या हैदराबादमधील एका कार्यक्रमात सहभागी होण्यावरून आणि शेतकऱ्यांची भेट न घेण्यावरून निशाणा साधला. “जर अमित शाह यांच्याकडे एका सभेला संबोधित करण्यासाठी १,२०० किलोमीटर लांब हैदराबादमध्ये जाण्यासाठी वेळ आहे तक १५ किलोमीटर लांब असलेल्या दिल्लीच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी आणि शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मात्र वेळ नाी. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चेसाठी ३ डिसेंबरची तारीख का दिली आणि त्यापूर्वी त्यांची भेट का घेतली जाऊ शकत नाही? त्यांनी ज्योतिषाचा काही सल्ला घेतला आहे का?,” असा सवालही सुरजेवाला यांनी केला.

शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या चार पाच मित्रांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचा दूर सारत आहेत. त्यांच्या केवळ चार पाच मित्रच २०-२५ लाख कोटी रूपयांचं कमोडिटी मार्केट चालवावं असं त्यांना वाटत आहे,” असा आरोप सुरजेवाला यांनी केला. परंतु जेव्हा ६२ कोटी शेतकरी एकत्र होतील तेव्हा दिल्ली दरबार सत्तेतून जाईल आणि हे पंतप्रधानांसाठी आव्हान असल्याचंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 8:41 pm

Web Title: delhi farmers protest latest update congress attacking on modi government randeep surjewala criticize jud 87
Next Stories
1 सर्व दहशतवादी, राष्ट्रद्रोही तर ‘हिंदुस्थानी’ कोण?, केवळ भाजपा कार्यकर्ते?; मेहबूबा मुफ्तींचा सवाल
2 शेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं : अण्णा हजारे
3 भारतातील पहिली सीप्लेन सेवा तात्पुरती बंद; ‘हे’ आहे कारण
Just Now!
X