दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना करोनाची लागण झाली आहे. सत्येंद्र जैन यांचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण यानंतर त्यांचा ताप वाढला होता. सत्येंद्र जैन यांच्यात करोनाची लक्षणं दिसल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा त्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा चाचणी केली असता दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

१५ जून अचानक श्वास घेण्यात होत असलेल्या त्रासामुळे तसंच जास्त ताप आल्याच्या कारणास्तव दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अचानक कमी झाल्याचंही सांगण्यात आलं होतं. सत्येंद्र जैन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.

यावेळी त्यांची करोना चाचणी केली असता रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. पण दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या चाचणीत त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ताप आणि सर्दी असल्याने करोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.

महत्त्वाची बाब म्हणजे सत्येंद्र जैन यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उपस्थित असणाऱ्या बैठकीला हजेरी लावली होती. दिल्लीमधील स्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित होती.