वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणं काही वेळा जीवावर बेतू शकतं. भांडण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचीच हत्या झाल्याच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीत अशाच एका घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. दोन गटांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या युवकाला तब्बल २२ वेळा भोसकण्यात आलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृत युवकाचे मित्रही या हाणामारीत जखमी झाले आहेत. मृत युवक भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
नीरज असे मृत मुलाचे नाव आहे. मुकेश आणि राकेश हे त्याचे मित्र जखमी झाले आहेत. मुकेश आणि राकेश दोघे दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे काम करतात. क्रिश्न आणि रवी हे दोन आरोपी सुद्धा सफदरजंग रुग्णालयात सुरक्षा रक्षकाचे काम करायचे. पण कंत्राटदाराने त्यांच्याजागी मुकेश आणि राकेशला नोकरीला ठेवले.
त्यामुळे चिडलेल्या क्रिश्न आणि रवीने मुकेश आणि राकेशवर हल्ला करण्याचा कट रचला होता. बुधवारी रात्री मुकेश आणि राकेश आपली शिफ्ट संपवून घरी जाण्यासाठी निघाले. त्यांचा मित्र नीरजही त्यांच्यासोबत होता. घरच्या वाटेवर असताना क्रिश्न आणि रवीने त्यांना अडवले. त्यांच्यामध्ये रस्त्यातच जोरदार वादावादी सुरु झाली.
शाब्दीक बाचाबाचीची परिणीती हाणामारीत झाली. क्रिश्न आणि रवीने मुकेश-राकेशवर हल्ला केला. नीरज त्यांचे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पण क्रिश्न आणि रवीने त्यालाच भोसकले. त्याच्यावर २२ वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. क्रिश्न आणि रवी विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 12:07 pm