लॉकडाउन काळात बाहेर फिरत असताना थांबवल्याच्या रागातून दिल्लीत एका इसमाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या सागरपूर भागात बुधवारी ही घटना घडल्याचं कळतंय. कृष्णसिंह यादवं असं मृत व्यक्तीचं नाव असून तो करोल बाग येखील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता. लॉकडाउन काळात घराबाहेर फिरणाऱ्या दोन तरुणांना कृष्णसिंहने हटकलं होतं, ज्याचा राग मनात ठेवत दोन तरुणांनी कृष्णसिंहच्या डोक्यावर दगडाने वार केले ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

घटनेच्या दोन दिवस आधी, आरोपी कृष्णसिंहच्या घराबाहेर फिरत होते. कृष्णसिंहने आक्षेप घेतल्यानंतर हे तरुण तिकडून निघून गेले. यानंतर बुधवारी हे तरुण पुन्हा एकदा त्याच विभागात फिरत असल्याचं पाहून कृष्णसिंहने त्या दोघांना हटकलं. यावेळी संतापलेल्या तरुणांनी कृष्णसिंहच्या डोक्यात दगडाने वार केला. जखमी झालेल्या कृष्णसिंहला तात्काळ नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी तात्काळ प्रकरणाचा तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली आहेत.

यामधील एक आरोपी २० वर्षांचा असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. या दोघांविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णसिंहच्या पाठीमागे त्याची आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे.