भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्यातच रेल्वेमध्ये अनेक सकारात्मक बदलही झाले आहेत. त्यातच आता दिल्ली-मुंबई हे अंतर 10 तासात आणि दिल्ली-हावडा हे अंतर 12 तासात पार केले, तर आश्चर्य वाटायला नको. या दोन्ही मार्गांवर प्रवासाला लागणारा वेळ 5 तासांनी कमी करण्याचा विचार सध्या रेल्वे करत आहे. यासाठी पुढील चार वर्षांमध्ये पायाभूत सुविधांवर 13 हजार 500 हजार कोटी रूपयांची गुंतवणुकही करण्यात येणार आहे. रेल्वेने 100 दिवसांच्या अजेंड्याअंतर्गत 11 प्रपोजल्स तयार केले आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत दिल्ली-हावडा मार्गावर सर्वात जलद चालणाऱ्या ट्रेनला ते अंतर कापण्यासाठी 17 तास लागतात. तर मुंबई-दिल्ली हे अंतर कापण्यासाठी 15 तासांचा कालावधी लागतो. दरम्यान, नव्या प्रपोजलनुसार हे अंतर कापण्यासाठी अनुक्रमे 12 आणि 10 तासांचा कालावधी लागणार आहे. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तो आता मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावाच्या दस्तावेजांनुसार या मार्गावर ट्रेनचा वेग 130 किमी प्रति तासांवरून 160 किमी प्रति तास करण्याचा मानस आहे.

पुढील तीन महिन्यांचा अजेंडा म्हणून ही योजना तयार करण्यात आली आहे. तर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ‘गिव इट अप’ अंतर्गत ट्रेनच्या तिकिटांवर मिळणारे अनुदान सोडण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत काही वरिष्ठ नागरिकांनीही आपले अनुदान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी रेल्वे जागरूकता अभियान सुरू करण्याच्याही विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.