राजधानी दिल्लीत पुढील दोन दिवसात दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. त्यामुळे हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कट आखला गेल्याचे सांगण्यात येत आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.

ताज्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरचे विभाजन थांबवण्यासाठी अनेक दहशतवादी संघटना जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर दिल्ली देखील त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. दिल्लीतील काही सरकारी कार्यालये आणि महत्वाच्या जागांवर हा हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारने या इशाऱ्यासंदर्भात दिल्लीत २८ ऑक्टोबर रोजी एक उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. यामध्ये सुरक्षा यंत्रणांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, गर्दीची ठिकाणं आणि महत्वाच्या इमारतींची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.