17 November 2017

News Flash

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरण : तरुणीची प्रकृती खूपच चिंताजनक

दिल्लीतील सामूहिक बलात्कार झालेल्या २३ वर्षीय तरुणीला उपचारांसाठी सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात तातडीने

पीटीआय , सिंगापूर | Updated: December 28, 2012 11:30 AM

दिल्लीतील सामूहिक बलात्कार झालेल्या २३ वर्षीय तरुणीला उपचारांसाठी सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले असून तिची प्रकृती कमालीची चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिली. गेल्या अकरा दिवसांपासून ही तरुणी मृत्यूशी झुंजत असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत.
दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयात पीडित मुलीवर तीन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. मात्र प्रकृती अस्थिर राहिल्यामुळे तिला बुधवारी रात्री उशिरा एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने सिंगापूर येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या तरुणीसोबत वरिष्ठ डॉक्टरांचे पथक आणि तिचे कुटुंबीय उपस्थित आहेत. गुरुवारी पहाटे ७.३० वाजता येथील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स उतरल्यानंतर तातडीने या तरुणीला रुग्णालयात हलवण्यात आले असून, लगेचच उपचार सुरू करण्यात आल्याचे रुग्णालय प्रवक्त्याने सांगितले.
पीडित तरुणीला चांगले उपचार उपलब्ध करून देण्याबरोबरच तिच्या कुटुंबालाही येथे योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे खास लक्ष देण्यात येत आहे. शिवाय त्यांची तसेच भारतीय डॉक्टरांची ओळख उघड करू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याचेही भारतीय दूतावासातर्फे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, या तरुणीच्या प्रकृतीविषयी अनेकांनी विचारणा करून मदतीचाही हात पुढे केला असल्याचेही दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. डी. अथानी यांनी सांगितले की, तरुणीच्या आतडय़ांना तसेच पोटात संसर्ग झाला असून तिच्या आतडय़ावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिला येथे उत्तम वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली होती. आता सिंगापूरमध्ये तिच्यावर पुढील उपचार करण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

First Published on December 28, 2012 11:30 am

Web Title: delhi rape victims condition critical battling for life